‘विठ्ठला ‘कोरोना’ची लस लवकर मिळू दे, जगाचे संकट दूर होऊ दे’ ! विठुरायाला साकडे

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक महापूजा केली. यावेळी, जगावर असलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे. कोरोनाची लस लवकर मिळू दे, असे साकडे राज्यातील सर्व जनतेच्या वतीने विठ्ठलाला घातल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शासकीय महापूजेनंतर अजित पवार यांनी सांगितले की, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच छोटे-छोटे कामगार, हातावरचे पोट असणार्‍या लोकांचे हाल होत आहे, त्यांना काम करता येत नाही. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गंभीर आहे. ही स्थिती लवकर बदलू दे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ दे, असे साकडे विठुरायाला घातले आहे.

वारकरी संप्रदायाने त्या लोकांना साथ दिली नाही
अजित पवार म्हणाले, काही लोकांनी देवाच्या बाबतीत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल आहे. त्यामुळे सर्वजण विठ्ठलाच्या दर्शनाची आतुर आहेत. कोरोनाचे संकट असले तरी चर्चेतून योग्य मार्ग काढण्याचे प्रयत्न केला पाहिजे. काहींनी यास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला, पण वारकरी संप्रदायाने त्याला साथ दिली नाही, असे पवार म्हणाले.

घाटाच्या कामाची होणार चौकशी
पंढरपुरात भिंत कोसळून झालेल्या अपघाताबाबत उमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. येथील चंद्रभागा नदी जवळील कुंभार घाटाजवळ बांधण्यात आलेला नवीन घाट ढासळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. ही गंभीर बाब आहे. अशी कामे करणार्‍यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे पवार म्हणाले.