कोरेगाव भीमा अभिवादन रॅलीसाठी बंदोबस्त द्या : भारिप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव (जि. पुणे) येथे अभिवादनासाठी मंगळवार १ जानेवारी रोजी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार आहेत. मागील वेळेस झालेल्या दंगलीची पार्श्वभूमी पाहता कार्यकर्त्यांसाठी चोख पोलीस बंदोबस्ताची मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना देण्यात आले. यावेळी शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, जिल्हा महासचिव दिलीप साळवे, योगेश साठे, सचिन बडेकर, जीवन कांबळे, बाळासाहेब गायकवाड, भाऊ साळवे, सागर चाबुकस्वार, मनोज साळवे, अजय शिंदे, नितीन घोडके, विनोद गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

भारिप बहुजन महासंघ, बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे, तसेच जिल्ह्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते भीमा कोरेगावला अभिवादनासाठी जाणार आहेत. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यकर्ते रॅलीने शांततेच्या मार्गाने जाणार आहेत. मागच्या वेळेस घडलेल्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी भारिपच्या वतीने करण्यात आली आहे.