नयनतारा सहगल प्रकरण : नगरमध्ये सांस्कृतिक दहशतवाद विरोधी समितीकडून निषेध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना पाठविलेले उद्घाटनाचे निमंत्रण रद्द केल्याबद्दल सांस्कृतिक दहशतवाद विरोधी समितीच्यावतीने पत्रकार चौकातील शाहिद भगतसिंग पुतळ्यासमोर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

प्रा. डॉ. कॉ. मेहबूब सय्यद यांच्या पुढाकाराने व जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निषेध सभेस कॉ. बाबा आरगडे, कॉ. शंकरराव न्यालपेल्ली, कॉ.सुभाष लांडे पाटील, कॉ. बन्सी सातपुते, कॉ. बहिरनाथ वाकळे, इंजिनिअर अभिजित वाघ, शब्दगंधचे सुनिल गोसावी, शर्मिला गोसावी, दिशा गोसावी, भगवान राऊत, सुभाष सोनवणे, प्रा. डॉ. अमन बगाडे, मसाप सावेडी शाखेचे जयंत येलूलकर, प्रा. संदीप गिर्हे, प्रा. रवींद्र पटेकर, नीलिमा बंडेलु, प्रियदर्शन बंडेलु, संध्या मेढे, प्रा. श्रीकांत काळोखे, सतीश सातपुते, कॉ. रामदास वागस्कर, प्रवीण सोनवणे, सप्तरंग थिएटर्स चे श्याम शिंदे, शब्बीर शेख, असिफ खान दुलेखान, पॉल भिंगारदिवे, नंदकुमार आढाव, दत्ता वडवणीकर आदी उपस्थित होते.

डॉ. मेहबूब सय्यद म्हणाले की, जेष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण रद्द करून आयोजकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. प्रा. संदीप गिर्हे म्हणाले, सध्याचे वातावरण सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रासाठी अत्यंत धोकादायक आहे. प्रा. श्रीकांत काळोखे म्हणाले, आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत, असा यक्ष प्रश्न आपणासमोर उभा आहे. जयंत येलूलकर म्हणाले की, नायनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याची घटना साहित्य प्रेमींना खटकणारी गोष्ट आहे. त्यामुळे पुरोगामी चळवळी दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तीविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

कॉ.बन्सी सातपुते म्हणाले, या घटनेचा निषेध म्हणून आपण काहीतरी प्रत्यक्ष कृती केली पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून २० फेब्रुवारी कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृती दिनानिमित्त जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना नगरमध्ये निमंत्रित करून त्यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल. शब्दगंधच्या कवयित्री शर्मिला म्हणाल्या की, जेष्ठ भारतीय लेखिका सहगल यांचा झालेला अपमान आमच्या जिव्हारी लागला असून तो केवळ एक स्त्रीचा अपमान नाही तर समस्त स्त्री जातीचा, आणि पुरोगामी विचारांच्या साहित्यिकांचा अपमान आहे. कॉ. बाबा आरगडे म्हणाले, जेष्ठ भारतीय लेखिका सहगल यांना संमेलनात जणिवपूर्वक बोलू दिले नाही या घटनेचा पुरोगामी विचारवंतांनी साहित्यिकांनी मुकाबला केला पाहिजे.