बलात्कार प्रकरणामुळं संतापले लोक ! इंडिया गेटवर पोलिस – आंदोलनकर्ते भिडले, अनेक मुली ‘बेशुध्द’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. उन्नावपासून लखनऊ आणि दिल्लीपर्यंत जोरदार निदर्शने होत आहेत. तसेच शनिवारी सायंकाळी दिल्लीच्या राजघाट ते इंडिया गेटपर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी मेणबत्ती मोर्चा देखील काढण्यात आला.

या दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकांचा रोष अधिक वाढला असल्याने निदर्शकांनी पुढे जाऊन पोलिसांचे बॅरिकेड तोडले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी वॉटर कॅनॉनचा वापर केला आणि रात्री निदर्शकांवर पाण्याचा वर्षाव केला.

पोलिस आणि निदर्शनकर्ते यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान बर्‍याच मुली बेहोश झाल्या आहेत. अनेक निषेध करणार्‍या मुली आणि महिलांनाही दुखापत झाली आहे. निदर्शकांच्या हाती फलक असून त्यात ‘वी वाॅंट जस्टिस’ असे नारे लावण्यात येत आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या नेतृत्वात हा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला आहे. स्वाती मालीवाल हे राजघाट येथे आमरण उपोषणास बसल्या होत्या. आज त्या राजघाट ते इंडिया गेटपर्यंत कॅन्डल मार्चसाठी निघाल्या आहेत. लखनऊ ते दिल्ली पर्यंत होणारे निदर्शने पाहून महिलांवरील गुन्हेगारीबाबत देशात किती संताप व्यक्त होत आहे याचा अंदाज येऊ शकतो.

लखनौमध्ये पोलिसांनी काॅंग्रेसवाल्यांवर लाठीमार केला
शनिवारी सकाळी दिल्लीत मेणबत्ती मोर्चाच्या आधी पोलिसांनी लखनऊमध्ये आंदोलन करणाऱ्या काॅंग्रेस नेत्यांवर लाठीमार केला. उन्नावमधील पीडित कुटुंबाला भेट देणारे भाजप खासदार साक्षी महाराज, मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि कमलाराणी यांच्याविरोधात काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती.

ज्या वेळी उन्नावमध्ये आंदोलन सुरू होते, त्यावेळी काॅंग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा लखनौच्या हजरतगंजमध्ये रस्त्यावर उतरले. याशिवाय शनिवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केले होते.

Visit : Policenama.com