डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या नागरी हक्कांच्या गळचेपीचा ‘दक्षिणायन’च्या सभेत निषेध

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत, लेखक आणि अभ्यासक डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या घटनादत्त नागरी हक्कांची गळचेपी करण्याचा, पोलिस खात्यामार्फत राज्य शासन जो पद्धतशीर प्रयत्न करीत आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीत, त्यांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून झडती घेण्याचा जो अमानुष प्रकार केला, त्याचा ‘दक्षिणायन’ (महाराष्ट्र) आयोजित एका सभेत जाहीर निषेध करण्यात आला.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात अतिशय मोलाचे योगदान आहे. रमाबाईनगर (मुंबई), गुजरातेतील २००२ साली झालेल्या अल्पसंख्याक समाजावरील हिंसाचार, खैरलांजीसारख्या अमानवी घटनांबाबत डॉ. तेलतुंबडे यांनी सखोल पाहणी-अहवाल तयार केला होता. दलित व अल्पसंख्य समाजावरील होणा-या अन्यायाविरूद्धची खरी परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वरील अहवालात निरपेक्षपणे केले आहे. आजवर त्यांनी शासनाच्या धोरणांचा अभ्यासपूर्ण समाचार घेतल्यामुळेच, शासनाने त्यांना विविध गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा डाव रचला असल्याची भावना या सभेमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या कारवायांमधून, नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करू पाहत आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना बहाल केलेल्या लोकशाही तत्त्वांविरूद्धची कृती असल्याचेही मत या सभेने व्यक्त केले. हा सर्व प्रकार शासनाने सत्वर थांबवावा असेही आवाहन शासनाला करण्यात आले.
या सभेचा अध्यक्षीय समारोप करताना, प्रसिद्ध लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी, शासनाच्या दडपशाहीविरूद्ध निर्भय बनून, आत्मविश्वासपूर्वक लढा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले, तसेच ‘दक्षिणायन’ चळवळीने या कामी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या सभेमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश दधीच, पत्रकार श्री. अरुण खोरे, माजी आमदार श्री. जयदेव गायकवाड, श्री. केशव वाघमारे, संदीप बर्वे, अभिजित मीनाक्षी, श्रीरंजन आवटे, राही श्रृती गणेश, इब्राहीम खान, प्रमोद राणा, आदींनी आपले विचार व्यक्त केले.
या सभेमध्ये श्री. अमोल पालेकर, श्रीमती संध्या गोखले, माजी सनदी अधिकारी श्री. रविंद्र सुर्वे व डॉ. सुशील सुर्वे, नाटककार आशुतोष पोतदार, चित्रकार रमाकांत धनोकर, कवी सुशीलकुमार शिंदे, हनुमंत पवार, शशांक पाटील, आदी मान्यवर देखील उपस्थित होते. श्री. प्रशांत कोठडिया यांनी प्रास्ताविक केले, तर दक्षिणायन (महाराष्ट्र) चे संघटक श्री. संदेश भंडारे यांनी आभार मानले.