भाजपच्या वतीने मंगळवारी वाघोलीत आंदोलन

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – राज्यातील महाविकास आघाडीच्या विरोधात राज्यभर आंदोलने करण्यात येणार आहे याच अनुशंगाने हवेली तालुका भाजपाच्या वतीने आज पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिरूर हवेलीचे भाजपाचे माजी आमदार बाबुराव पाचार्णे, प्रदिप कंद, गणेश कुटे, संदीप भोंडवे, धर्मेंद्र खांडरे, सुनील कांचन, दादासाहेब सातव, अनिल सातव, समीर भाडळे, सुदर्शन चौधरी, श्याम गावडे, गणेश चौधरी, शिवाजी गोते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बाबुराव पाचार्णे म्हणाले की, भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सता स्थापन केलेल्या शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी एकही आश्वासन पाळले नाही.

एकीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले असताना दुसरीकडे कर्जमाफी योजना म्हणून फसव्या योजनेची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता या महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. आमच्या काळातील सुरू असलेल्या योजना बंद करण्याचे काम हे सरकार करत असून यांच्या योजनेचा आणखी कोणताही थांगपत्ताच नाही यामुळे सर्व सामान्य माणूस यांना आत्ताच वैतागला आहे.

हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न करणे, शेतकऱ्यांना दिवसा लाईट न देणे, समाजहिताची कामे अडवणे, महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, अ‍ॅसिड हल्ला, महिलांना जाळून टाकणे अशा घटना दिवसेन् दिवस वाढ होत असल्याने महिला व तरूण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा अनेक घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करत आहे. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन पूर्व हवेली तालुक्यातील वाघोली येथील केसनंद फाटा येथे मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी सकाळी 11 ते 3 यावेळेत करण्यात येणार आहे, असे पाचार्णे यांनी सांगितले .