अभिमानास्पद ! ‘आम्ही कानडी आहोत पण मुंबईत राहतो, म्हणून आमची भाषा मराठीच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईची आमभाषा हिंदी म्हणत ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेवरुन वादाचे रान उठले आहे. मनसेकडून देखील त्यांना दम भरण्यात आला. महाराष्ट्राची अन् मुंबईची आम आणि खास भाषा मराठीच असल्याचे सांगत आपल्या वक्तव्यावर मराठी माणसांची माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर मालिकेच्या एका भागातून महाराष्ट्रातील मराठी जणांची माफी मागण्यात आली होती. यानंतर, आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात कानडी भाषिकांचे मराठी प्रेम दिसून आले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चंपक चाचा या व्यक्तिरेखेने मुंबईची भाषा हिंदी असून सुविचार हिंदीत लिहिला पाहिजे असे विधान केले होते. त्यानंतर मनसे आक्रमक झाली होती. तारक मेहताच्या एका भागात संवाद होते की, आपले गोकूळधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे, हिंदी. हा संवाद बापूजी चंपकलाल यांचा होता. यानंतर मनसेचे अमेय खोपकर यांनी नेमक्या याच संवादावर आक्षेप घेतला आणि हेच ते मराठीचे मारक मेहता अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसेच यांची मस्ती उतरवावीच लागेल असा इशारा दिला होता.

यानंतर या मालिकेबद्दल महाराष्ट्रातून निषेध नोंदवण्यात आला होता. तसेच महाराष्ट्राची भाषा मराठी असून, माफी मागा असे सांगण्यात आले होते. त्यानंतर मालिकेच्या संबंधित कलाकराने माफी मागितली. त्यानंतर हा मुद्दा शांत झाला. त्यानंतर आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय तो एका कन्नड भाषिक जोडप्याचा फोटो.

या फोटोत जोडप्याने आपल्या हातात एक फकत धरला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की आमची भाषा मराठीच आहे. आम्ही कानडी आहोत, पण आम्ही मुंबईत राहतो, म्हणून आमची भाषा मराठीच !

मूळ कर्नाटक राज्यातील आणि कानडी मातृभाषा असलेलं हे जोडपं कदाचित मुंबईत राहत आहे, परंतु या जोडप्याचं मराठी प्रेम पाहून अनेकांनी त्यांचं कौतूक केलं. या जोडप्यास अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याचा फोटो व्हायरल होत आहे.