पुण्याच्या वैदहीचे चित्र बनले अमेरिकेतील ‘थिंक वूमन’ मोहिमेचे प्रतीक !

पुणे : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जो बायडन यांनी नुकतीच शपथ घेतली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उल्लेखनीय बाब म्हणजे स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘थिंकवूमन’ या राबविण्यात आलेल्या मोहिमेचे प्रमुख प्रतीक (सिम्बॉल) म्हणून पुण्यातील एका चित्रकार युवतीच्या चित्रकृतीचा वापर करण्यात आला. ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. वैदही (vaidehi) रेड्डी या चित्रकार युवतीचे नाव आहे.

‘थिंक वूमन’ या संस्थेने अमेरिकेतील मेरिलॅन्ड राज्यातील मोहिमेत पुण्यातील वैदेहीच्या चित्रकृतीला मानाचे स्थान दिले. वैदहीने आपले शालेय शिक्षण पुण्यातील आर्मी स्कूलमध्ये पूर्ण केले असून तिचे वडील भारतीय लष्करात कार्यरत आहेत. अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉर्नल विद्यापीठाची सुमारे २ कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही वैदेहीने मिळवली आहे. वैदहीच्या या चित्रकृतीमध्ये सध्याच्या पिढीचे स्त्री चित्रण आहे. शिवाय ही कलाकृती या शतकातील स्त्रीच्या प्रेरणा, विचार व स्वप्न दर्शवते म्हणूनच या चित्रकृतीची निवड ‘थिंक वूमन’ या संस्थेने केली होती. वैदेहीने या चित्राची निर्मिती सन २०१८ मध्ये केली होती. ही चित्रकृती अबस्ट्रॅक्ट कंटेम्पररी स्टाईल प्रकारातील आहे. वैदेहीला यापूर्वी अनेक सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी तिने २०१४ साली राष्ट्रीय स्तरावरील ‘गुगल डूडल’ स्पर्धा जिंकली होती.

यासंदर्भात बोलताना वैदेही रेड्डी म्हणाली की, थिंक वूमन संस्थेने माझे कार्य ऑनलाइन पाहिले आणि माझ्या चित्रकृतीची निवड केली. निवडणुकीच्या प्रक्रियेत महिला जागरूकता आणि महिला मतदारांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांविषयीच्या विधायक कार्यासाठी याचा वापर करण्यात आला हे माझ्यासाठी सन्माननीय आहे. ही चित्रकृती एकविसाव्या शतकातील स्त्रीची स्वतंत्र विचारसरणी, प्रेरणा आणि स्वप्ने दाखवते.