ओवेसींचं मुख्यमंत्री आदित्यनाथांना आव्हान, म्हणाले – ‘तुम्ही योगी असल्याचं 24 तासांत सिध्द करा’

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन –  बिहार निवडणुकांत भाजप आणि एमआयएम यांच्यात वाकयुद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. काल प्रचारादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसींवर निशाणा साधला होता. ओवेसी आणि राहुल गांधी पाकिस्तानचे कौतुक करतात, असा आरोप योगींनी केला होता. त्याला आता ओवेसींनी उत्तर देत योगी यांच्यावर टीका केली आहे.

योगींवर हल्ला करत ओवेसी यांनी म्हटलं की, योगींनी माझ्यावर वैफल्यग्रस्तेतेतुन आरोप केले होते. त्यांना मी आव्हान देतो की त्यांनी खरे योगी असल्याचे पुरावे २४ तासांमध्ये द्यावेत. मी पाकिस्तानमध्ये गेलो होतो. तेव्हा मी भारतीय लोकशाहीवर बोललो होतो हे त्यांना माहिती नाही का, असा सवाल त्यांनी योगींना विचारला आहे.

दरम्यान, जुमई येथील भाजप उमेदवार श्रेयसी सिंह यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतली होती. तेव्हा बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी आणि ओवेसी हे पाकिस्तानची प्रशंसा करतात. या दोघांकडून तुम्ही देशहिताची कल्पना करु शकता का. हे दोघे देशाचे हित साधणार का. देशाचा शत्रू असलेला देश जो भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणतो. अशा देशाच्या हिताची गोष्ट करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवता येईल ? तद्वतच काशीरामधून कलम ३७० हटवल्यानंतर राहुल गांधी आणि ओवेसी यांना त्रास झाला, असा आरोपही त्यांनी केला.