नागपूरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील महिलांना सुरक्षा पुरवा, महापौरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहरातील महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षेच्या संदर्भात कडक उपाययोजना करावी. तसेच रात्रीच्या वेळी नोकरी निमीत्त अथवा अन्य कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी नागपूर पोलिसांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे आज (सोमवार) केली आहे. महापौर उषा ढोरे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेऊन महिलांच्या सरक्षेबाबत मागण्यांचे निवेदन दिले.

महापौरांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे. या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी हाताला काही ना काही काम मिळते म्हणून देशभरातील सर्व जाती-धर्माचे लोक शहरात वास्तव्यास आले आहेत. पिंपरी-चिंचवड हे शहर एक महानगर म्हणून ओळखले जात आहे. गेल्या काही वर्षापासून संपूर्ण देशातच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्याला पिंपरी-चिंचवड शहर सुद्धा अपवाद नाही. शहरातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जशी समाजाची जबाबदारी आहे, तशी पोलिसांचीही आहे. पोलिसांनी शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याची आवश्यकता आहे. परंतु, गेल्या काही महिन्यापासून शहरात वेगळेच चित्र दिसत आहे.

शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी येथील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागलेली आहे. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील रोडरोमिओंचा प्रश्न गंभीर आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस आणि महिलांचा संवाद होत असल्याचे चित्र कुठेही दिसत नाही. तसेच पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती होत नाही हे गंभीर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या गंभीर घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पोलिसांनी महिला सुरक्षेबाबत गंभीर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

नागपूर पोलिसांनी रात्रीच्या वेळी नोकरी अथवा अन्य कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही अशी व्यवस्था निर्माण करावी. तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना पोलीस ठाणे व चौकीत सन्मानाची वागणूक मिळावी तसेच रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.