अतिजलद मार्गासाठी ५०० कोटींची तरतूद व्हावी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहराच्या जुन्या हद्दीतील प्रस्तावित एचसीएमटीआर ( अतिजलद मार्ग ) करिता महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी पाचशे कोटींची तरतूद करावी तरच हा प्रकल्प पूर्ण होऊन वाहतुकीची समस्या सुटण्यास मोठी मदत होईल, असे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.
शहराच्या १९८७ सालच्या विकास आराखड्यात हा मार्ग सुचविण्यात आला. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. गेल्या बारा वर्षांपासून बागुल यांनी प्रस्तावित मार्गाचा पाठपुरावा केला. मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे भेटीत मंगळवारी एचसीएमटीआर प्रकल्प पूर्ण करू असे जाहीर आश्वासन दिल्याने आता या प्रकल्पाला गतीने चालना मिळेल असा विश्वास निर्माण झाला आहे.
हा प्रस्तावित मार्ग पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रस्ता, दांडेकर पूल, मित्रमंडळ, वानवडी, हडपसर, नगररोड, येरवडा आणि पुन्हा पुणे विद्यापीठ असा जोडणारा आहें. एकूण ३५ किलोमीटर लांबीचा आणि २४ फूट रुंदीचा हा मार्ग एलेव्हेटेड असेल. अलीकडेच हा प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरल्यावर त्या दृष्टीने पुणे महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकात दोनशे कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, शहराची गरज लक्षात घेता साडेचार हजार कोटींचा हा प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी दरवर्षी पाचशे कोटींच्या तरतुदीची आवश्यकता आहे, असे बागुल यांचे म्हणणे असून त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना नुकतेच पत्र पाठविले आहे.
अतिजलद मार्गाचा प्रकल्प अहवाल आणि आराखडा तयार झालेला आहे. एलेव्हेटेड रस्ता असल्याने खाजगी भूसंपादनाची गरज पडणार नाही. राज्य सरकारने प्रकल्पासाठी काही जागा देऊही केली आहे. निधी उपलब्धतेसाठी सल्लागार संस्था नेमण्यात आली आहे, पालिकेच्या अंदाजपत्रकातील कामांवर परिणाम न होता पाचशे कोटींची तरतूद होऊ शकते तसा पर्यायही मी दिला आहे, अशी माहिती बागुल यांनी सांगितली.
चालू असलेल्या मेट्रो प्रकल्पाबरोबरच हा प्रकल्पही मार्गी लागला तर येथील वाहतुकीत लक्षणीय परिणाम दिसतील.