आरोपी पळाला : पीएसआय, हवालदारासह चार पोलीस निलंबित 

0
22
पोलीस
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीसांच्या ताब्यात असलेले आरोपी ऋतिक शुक्ला (२०) आणि सतीश काळे हे दोघे वेगवेगळ्या वेळी पळून गेले होते. या दोघांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसून त्यांच्या शोधकार्यात हलगर्जीपणा झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे एक पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस हवालदार आणि ४ पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे.

फ्लिपकार्ट कंपनीत ऋतिक राकेश शुक्ला (२०, रा. हरिजन कॉलनी, जरीपटका) हा डिलीव्हरी बॉय म्हणून नोकरी करत होता. १९ ऑगस्ट रोजी त्याने कंपनीतून १० पार्सल घेतले आणि ते ग्राहकांना पोहोचविल्यानंतर त्यापासून मिळालेले १ लाख ३ हजार १९५ रुपये घेऊन तो पळून गेला होता. कंपनीने त्याची १० दिवस वाट बघितली, पण तो न आल्याने शेवटी ३० ऑगस्ट रोजी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ऋतिक शुक्लाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पैशाची अफरातफर केल्यानंतर ऋतिक गोवा येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याने एका व्यक्तीची दुचाकी चोरली आणि ती फिरवून दिवस घालवू लागला. याप्रकरणी दुचाकीमालकाच्या तक्रारीवरून गोवा पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला गोव्याच्या कारागृहात ठेवण्यात आले होते.

गोवा पोलिसांनी ऋतिकला पकडल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले, शिपाई राजेश लोही, नीलेश इंगोले, असे तीन शिपाई गोव्याला गेले होते. गिट्टीखदान पोलिसांनी गोवा पोलिसांच्या ताब्यातून ऋतिकला ताब्यात घेतले आणि ते मुंबई- गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसने ऋतिकला घेऊन नागपूरला निघाले. आरोपी पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्याच्या हातात हतकडी लावली होती. पहाटे तीन वाजताच्या सुमारास गाडी मलकापूर रेल्वेस्थानकावर आल्यानंतर ऋतिकने सोबत असलेल्या नीलेश इंगोले नावाच्या शिपायाला लघुशंकेला जायचे असल्याचे सांगितले. शिपाई नीलेशने त्याला शौचालयाकडे नेले. यादरम्यान, आरोपी ऋतिकने हातकडी काहीशी ढिली करून ठेवल्याचे नीलेशच्या लक्षात आले नाही. शौचालयाच्या जवळ येताच त्याने नीलेशच्या हाताला झटका दिला आणि पळ काढला होता.

तर सतीश ऊर्फ छोट्या जैनू काळे (३५) रा. बिलौनी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद हा कुख्यात दरोडेखोर असून नाशिक येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एका केसच्या सुनावणीकरिता त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी नागपूर पोलीस दलातील एस्कॉर्ट पथकाचे पोलीस कर्मचारी हवालदार ईश्वर गुडधे, पोलीस शिपाई केशव दिघोरे आणि सतीश गवई हे सेवाग्राम एक्स्प्रेसने घेऊन जात असताना त्याने पळ काढला होता. फरार दोन्ही कैदी अद्यापही सापडत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांचा निष्काळजीपणा यास जबाबदार असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे चौकशीअंती त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.