‘त्या’ प्रकरणी पुण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह ३ पोलिस तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकासह इतर ३ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. टेकडीवर वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मुला, मुलींना शासकिय सोपस्कर न पाळता पोलीस चौकीत बसवून ठेवत कोणतीही कारवाई न करता वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी चौघांना निलंबित करण्याचा आदेश अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे यांनी दिला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अतुल अरुणराव शेटे, पोलीस हवालदार विकास कुंडलिक टेमगिरे, पोलीस हवालदार कृष्णात दत्तात्रय ननावरे, पोलीस शिपाई बाळू यमाजी यादव अशी निलंबित करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

मोहम्मद वाडीतील हेवन पार्क येथील टेकडीवर २५ मे रोजी काही मुले व मुली वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते दारू पीत आहेत अशी माहिती मिळाल्यावर बीट मार्शलने तेथे जाऊन सर्वांना चौकशीसाठी वानवडी बाजार पोलीस चौकीत आणले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शेटे व संबंधित कर्मचारी यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता चौकीत बसवून ठेवले. त्याची ठाण्याच्या दैनंदिनीत नोंदही केली नाही. तसेच वरिष्ठांना याची माहिती देताना दिशाभूल केली. तर महिलांची चौकशी करण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बोलविले नाही. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अतुल शेटे आणि इतर ३ कर्मचाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करत पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे कृत्य केल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.