दारुच्या नशेत ‘डांगडिंग’ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ड्रंक ड्राईव्ह करावाई सुरु असताना दारू पिऊन कार चालवणा-या एका पोलीस अधिका-याला गावकऱ्यांनी बेदम चोप दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील एका पोलीस अधिका-याने दारुच्या नशेत कार चालवत पाच जणांना जखमी केले. त्यामुळे संतापलेल्या गावक-यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गित्ते या पोलीस अधिका-याला चोप दिला. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे सोमवारी भर दुपारी घडला. पोलीस उपनिरीक्षक संतोष गित्ते हा वादग्रस्त असून वरिष्ठांकडून त्याला नेहमीच पाठिशी घातले जात असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे.

संतोष गित्ते हे चाकूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकलेले असतात. मात्र, वरिष्ठांच्या कृपाअशीर्वादाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. सोमवारी भर दुपारीच गीत्ते याने आपल्या कारमध्ये दारू पित नलेगाव येथील आऊट पोस्टकडे जात होते. दारूच्या नशेत त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर गीत्ते यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडून चोप दिला. या घटनेनंतर गीत्तेला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. अशीच कारवाई यापूर्वी केली असती तर पाच जण जखमी झाले नसते अशी प्रतिक्रीया गावकऱ्यांनी दिली आहे. संतोष गीत्ते याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या.