राजधानी दिल्लीत रात्री 9.30 वाजता महिला PSI ची गोळ्या घालून हत्या, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेच्या मतदानासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असताना भररस्त्यावर एका महिला पोलीस उपनिरीक्षकाची गोळी घालून हत्या करण्यात आली. पोलीस स्टेशनवरील काम संपवून घरी परत जाणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रीती अहलावत यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दिल्लीतील रोहिणी पूर्व मेट्रो स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, २६ वर्षाच्या प्रीती अहलावत या पटपडगंज इंडस्ट्रियल एरिया ठाण्यात नेमणूुकीला होत्या. काम संपल्यानंतर त्या घरी जात होत्या. मेट्रोने त्या रोहिणी पूर्व मेट्रो स्टेशनवर उतरल्या. त्यानंतर त्या सुमारे ५० मीटर चालत गेल्यानंतर एक जण त्यांच्याजवळ आला व त्याने त्यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांना घटनास्थळी ३ पुंगळ्या मिळाल्या. तेथील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.

वैयक्तिक वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. प्रीती या मुळच्या सोनीपत येथील राहणाऱ्या होत्या. रोहिणी येथे त्या भाड्याच्या घरात रहात होत्या. त्यात २०१८ च्या बॅचच्या पोलीस उपनिरीक्षक होत्या. दिल्ली विधानसभेचे मतदान शनिवारी होत आहे. त्याच्या आदल्या रात्री कडक बंदोबस्त असताना हा प्रकार घडला.