१ लाख २० हजारांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅंटी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – वाळूची वाहतुक केल्याबद्दल पकडलेल्या गाडीवर दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी व ती पुन्हा चालण्यासाठी हप्त्यासाठी लाच म्हणून  १ लाख २० हजार रुपये खासगी व्यक्तीमार्फत  स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अ‍ॅंटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

विजय भाऊराव गायकवाड (वय 40 पोलीस उप निरीक्षक, गोंदी पोलीस ठाणे, जि.जालना, रा. घर नंबर 15 ग्रामीण बँक कॉलनी, रंगोपालनगर पाडेगाव, औरंगाबाद), खाजगी व्यक्ती भीमराव इंदारराव बोबडे ( वय 34, रा. बाजारगल्ली तिर्थपुरी, ता. घनसावंगी जि. जालना) अशी दोघांची नावे आहेत.

अ‍ॅंटी करप्शनने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. वाळू वाहतुकीप्रकरणी त्यांच्या गाडीवर जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांनी ७० हजार रुपयांची तसेच पुन्हा त्यांच्या वाळूच्या गाड्या चालण्यासाठी ५० हजार रुपये हप्ता असे एकूण १ लाख २० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली. त्यानंतर ही रक्कम त्याने खासगी व्यक्ती भीमराव बोबडे याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने यासंदर्भात अ‍ॅंटी करप्शनकडे तक्रार केली. त्यानंतर त्याची पडताळणी अन्टी करप्शनने केल्यावर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी अ‍ॅंटी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी भीमराव बोबडे याला तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.