‘पबजी’ खेळणाऱ्यांनो ही बातमी नक्की वाचा ; सलग ६ तास खेळल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आजच्या या मोबाईलच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने स्वतःच्या करमणुकीसाठी अनेक साधने आणि गेम बाजारात आणल्या आहेत. मात्र याच्या अतिवापराने काहींना आपला जीव गमवावा लागत आहे. सध्या मुलांपासून ते तरुणांपर्यंत साऱ्यांनाच पबजी गेमने वेड लावले आहे. सगळ्यांचा याचे अक्षरशः व्यसन लागले आहे. मात्र या व्यसनामुळे एका १६ वर्षीय मुलाने आपला जीव गमावल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. तासंतास मोबाईलमध्ये डोकं घालून बसणाऱ्या या तरुण पिढीला यामुळे आपण कुठे जात आहोत हे देखील कळेनासे झाले आहे.

फुरकान कुरेशी असे मृत मुलाचे नाव असून त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तो २६ मेला रात्री दोन वाजेपर्यंत पबजी गेम खेळत होता. त्यानंतर २७ मेला सकाळी उठून तो सहा तास हा गेम खेळत होता. त्यानंतर ब्लास्ट कर, ब्लास्ट कर असे तो ओरडू लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. कुरेशी कुटुंबीय नीमच येथे एका सोहळ्यासाठी गेले असताना ही घटना घडली. घटना घडल्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले, मात्र तेथे नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुबियांनी याप्रकरणी पोलिसांना कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलीस कोणत्याही प्रकारचा तपास करणार नाही. याच गेमवर अनेक देशांत त्याचप्रमाणे भारतात देखील बंदी आणण्याची मागणी केली जात होती. नेपाळमध्ये या गेमवर बंदी घालण्यात आली आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर ही बंदी घालण्यात आली.

Loading...
You might also like