धक्कादायक..! PUBG खेळण्यासाठी महागडा मोबाईल न दिल्याने तरुणाची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या तरुणाईला पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर आता PUBG या गेमने वेड लावले आहे. तरुणाईमध्ये सध्या या गेमची क्रेझ पहायला मिळत आहे. मुंबईमध्ये हा गेम खेळ्यासाठी तरुणाने आपल्या आई-वडीलांकडे महागड्या स्मार्टफोनची मागणी केली. मात्र, आई-वडीलांनी मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कुर्लायेथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या आई-वडीलांकडे PUBG खेळण्यासाठी महागड्या मोबाईल फोनचा हट्ट धरला. मात्र हा फोन ३७ हजार रुपयांना असल्याने एवढ्या किंमतीचा मोबाईल घेणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या मुलाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘PUBG’ या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी एका चिमुकल्याने केली होती. मुंबईतील 11 वर्षांच्या विद्यार्थ्याने PUBG वर बंदी आणा असं सांगणार एक पत्र केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिलं होतं. अहद असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने राज्य सरकारला चार पानांचं पत्र लिहिलं.

PUBG मुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहेत. तसेच मुलं हिंसक होत असल्याचं सांगत अहदने या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. अहदची आई मरियम नियाझ या वकील आहेत. ‘सरकारने पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे,’ असे त्यांनी म्हटलं होतं. तसेच पबजी खेळण्याची सवय जम्मू-काश्मीरमधील एका तरुणाला महागात पडली होती. सलग 10 दिवस पबजी खेळल्याने तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती समोर आली होती.