पुण्यातील डॉक्टर करणार रक्तदानाबाबत जनजागृती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानाच्या जनजागृतीची गरज आजही भासत आहे. कारण रक्तदान करणारांची संख्या खुपच कमी आहे. समाजिक संस्था, मंडळे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातूनच रक्त उपलब्ध होते. रक्तदानाचे हे प्रमाण अधिक वाढविण्याची गरज असून यासाठी पुण्यातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. रक्तदानासाठी लोकांनी मोठ्या संख्येने पुढे येण्यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा पुणे विभाग जनजागृती करणार आहे.

रक्तदानाच्या या जनजागृतीसाठी पुण्यातील डॉक्टर भाषणांच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. तसेच अन्य कार्यक्रमही राबवण्यात येणार आहेत. आयटी कंपन्या, सोसायटी आणि कॉलेजांमध्ये जाऊन पुण्यातील डॉक्टर रक्तदानासंबंधी जागृती करणार आहेत. पुढील आठवड्यापासून हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर रक्तदानाच्या प्रोत्साहनासाठी भाषणे देतील. दरवर्षी मे आणि जूनमध्ये रक्ताची कमतरता जाणवते. त्यामुळे लोकांना रक्तदानाविषयी जागरूक करणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लोक बाहेरगावी जात असल्याने रक्तदान कमी प्रमाणात होते. यासाठी रक्तदानाची शिबिरे मोठ्या प्रमाणात भरवली पाहिजे. लोकांनी देखील रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ज्या सोसायटीमध्ये, कॉलेजमध्ये किंवा कंपन्यामध्ये अशा प्रकारच्या लेक्चरचे आयोजन करायचे त्यांनी पुणे आयएमए कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे आयएमचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.

डॉक्टर स्वतः आयटी कंपनी, सोसायटी आणि कॉलेज अशा ठिकाणी जाऊन रक्तदानासंबंधी भाषण देणार आहेत. याशिवाय तेथे प्रेझेंटेशन देखील देणार आहेत. लोकांना रक्तदानाचे महत्त्व समजले तर ते रक्तदानासाठी पुढाकार घेतील, असे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. राजन संचेती म्हणाले.