डोळ्यांच्या आरोग्याबाबत रॅलीतून जनजागृती

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक नेत्र काचबिंदू दिनानिमित्ताने नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालय, आडगाव वैद्यकीय महाविद्यालय, आयएमए यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्हा रुग्णालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. तेथून त्र्यंबक नाका, सीबीएस, एम. जी. रोड, नेहरू गार्डन, शालिमार, आयएमए हॉल येथे रॅलीचा समारोप करण्यात झाला. रॅली दरम्यान मोतीबिंदू, काचबिंदूसंदर्भातील जनजागृतीपर संदेश देणारे फलक आणि घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा – नैसर्गिक उपचार पद्धतीचा अभ्यास करा  

आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. भोई, उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. रत्ना रावखंडे म्हणाल्या, मोतीबिंदू आणि काचबिंदू यांचा वेळीच उपचार होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी किमान दोन-तीन महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे. तर काचबिंदूसंदर्भात समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे डॉ. रावखंडे यांनी सांगितले. रॅलीत इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब, रायझिंग सन फाउंडेशन, एम. व्ही. पी. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, ऑप्टॉमेट्री कॉलेजचे विद्यार्थी, सिव्हिल हॉस्पिटलच्या नेत्र विभागातील कर्मचारी, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, अत्त-दीप-भव मेडिकोज सोशल वेलफेअर असोसिएशनचे सदस्य यांच्यासह डॉ. गोपाळ अरोरा, डॉ. नानासाहेब खरे, डॉ. कुणाल निकाळे, डॉ. आनंद पांगारकर सहभागी झाले होते.