पुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने वाहतूक नियमांची जनजागृती

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीने ४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे-नगर महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात नुकतीच वाघोली येथे जिल्हा वाहतूक पोलिस विभाग, लोणीकंद पोलिस स्टेशन व फियाट-टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. वाघोली येथील केसनंद फाटा चौकात मंगळवारच्या आठवडे बाजाराचे औचित्य साधून वाहतुकीच्या नियमाची जनजागृती पथनाट्यातून करण्यात आली.

पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप जाधव यांच्या हस्ते वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावरील केसनंद फाटा चौकात जनजागृती अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. केसनंद फाटा येथे पोलिसांच्या वतीने पथनाट्य,वाहतुक नियमांची माहितीपत्रके वाटून व वाहनचालकांशी संवाद साधून वाहतुक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. फियाट-टाटा मोटर्सच्या माध्यमातून समर्थ अॅकॅडमीच्या तरुणांनी पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती केली.

यावेळी लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, महामार्ग वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रामदास शेळके, वाघोलीचे माजी उपसरपंच संदीप सातव, वाहतुक कृती समीतीचे संपत गाडे उपस्थित होते. यावेळी दुचाकी चालकांसाठी हेल्मेटचा वापर, चारचाकी चालकांसाठी सीटबेल्टचा वापर, वाहनांचा वेग, अपघात कसे टाळावेत ईत्यादी बाबत डिजीटील स्क्रीनद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.