‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं औरंगाबाद शहरामध्ये ‘या’ तारखेपासून ‘जनता कर्फ्यू’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १० ते १८ जुलै दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सोमवारी (दि. ६) रोजी प्रशासकीय अधिकारी व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जनता कर्फ्यू च्या काळात संचारबंदीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी चार दिवसांमध्ये तयारी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे.

कोरोना संसर्गाचा प्रसार शहराबरोबर ग्रामीण भागात देखील वाढत आहे. वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
त्यामुळे वाळूज परिसरात चार जुलैपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने शहरात सुद्धा संचारबंदी लागू करायची की नाही? यासाठी सोमवारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक पार पडली. या बैठकीस खासदार भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट,अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, घाटीच्या डीन कानन येळीकर यांच्या सह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, कोरोना संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी नागरिक सहकार्य करत आहेत. सर्वांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेतून १० पासून १८ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात येईल. नागरिकांनी आतापासून किराणा, भाजीपाला आणून ठेवावा. कोणीही पॅनिक होऊ नका, तयारी करण्यासाठी चार दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभागी व्हावे, यादरम्यान आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत असही त्यांनी सांगितलं.

हे राहणार बंद

जनता कर्फ्यूच्या काळात फळ, भाजीपाला, किराणा दुकाने बंद ठेवली जातील. तसेच कोणाची सुद्धा गैरसोय होणार नाही, याची काळजी महापालिकेचे आयुक्त घेतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.