गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर अजित पवारांनी पुणेकरांना केलं ‘हे’ आवाहन, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोना साथीच्या वाढत्या प्रभावामुळे गर्दी होऊ नये म्हणून सर्व सण-उत्सव हे साधेपणानेच साजरे केले जात आहेत. त्यामुळे यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जनास परवानगी देता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे उत्सव हे अतिशय साधेपणाने साजरे केले जात आहेत. त्यानुसारच आता गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश विसर्जनास परवानगी मिळाल्यास लाखो लोक रस्त्यावर येतील, असे होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे अधिवेशनही रद्द करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे खबरदारी घेणे काळाची गरज आहे असेही अजित पवार म्हणाले.

प्लाझ्मा दान करण्यासाठी जनजागृती करा: उपमुख्यमंत्री पवार

प्लाझ्मा थेरपीचा उपयोग कोरोनाचा गंभीर आजार झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी केला जात आहे. म्हणून नागरिकांमध्ये प्लाझ्मा दान करण्यासाठी जनजागृती करा, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. ते म्हणाले, ‘गंभीरपणे आजारी रूग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त असल्याने नागरिकांना याबाबत माहिती व्हायला हवी. तसेच कोरोनाबद्दल नागरिकांची भीती दूर करण्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंग बनवून नागरिकांना वितरित केले जावे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे होत आहेत ही एक दिलासादायक बाब आहे. तसेच संसर्ग रोखण्याव्यतिरिक्त कोरोना बाधितांवर वेळेवर उपचार करण्यात यावेत याकडे लक्ष देणे देखील महत्वाचे आहे. त्यासाठी आपण काळजीपूर्वक नियोजनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विभागीय आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि शांतनू गोयल, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते. तसेच या बैठकीत अजित पवार यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना अनेक महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत.