हुतात्मा दिनानिमित्त पुण्यातील ‘या’ संघटनेकडून जाहीर सभा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 71 वी पुण्यतिथी आहे. या 71 व्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजेच महात्मा गांधी हुतात्मा दिनानिमित्त पुण्यातली लोकांच्या पुढाकारातून आज महात्मा फुले मंडई येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अनेकांनी उपस्थिती दर्शवली. मुख्य म्हणजे विविध पुरोगामी संस्था-संघटनांचे प्रतिनिधीही यात सामिल झाले होते. लोकायतकडून या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी बाबा आढाव होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “गांधींचा विचार आजही जिवंत आहे. याचे उत्तम आणि ताजे उदाहरण म्हणजे पुण्यातील काऊंसील हाॅलसमोर आपल्या मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसलेले इंजिनिअर तरूण होय. इतकेच नाही तर, आझाद मैदानावर बसूनही न्याय मिळत नाही म्हणून सरळ मंत्रालयात धडकणाऱ्या आरोग्यसेविकांच्या निर्भिडतेतही आज गांधी जिवंत आहे. गांधींनी या देशाला सहजीवनाचा मार्ग सांगितला. आपल्याला गांधींना आजच्या संदर्भात समजून घेण्याची गरज आहे. जर तरुणांना क्रांती करायची असेल तर त्यांनी तळागाळात जाऊन काम करण्याचा गांधींजींचा संदेश अंमलात आणण्याची गरज आहे.”

लोकायतचे नीरज जैन यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “शेवटच्या काळात गांधीजी एकटे पडले होते. देशात उफाळलेल्या धार्मिक दंगलींनी  उद्विग्न होऊन ते म्हणाले होते की, जगणं आता त्यांना टाेचायला लागलं आहे. जर या देशात हिंदू-मुस्लिम एकत्र राहू शकत नसतील तर मी मरणं पसंत करेन. पूर्वी 30 जानेवारीला सकाळी शहरात अनेकजण मौन ठेवायचे. पण आज लोकांना या देशाच्या महानायकाचा विसर पडला आहे. अनेकांना तर हेदेखील माहीत नाही की, आज हुतात्मा दिन आहे. आज वाढती हिंसा आणि चंगळवादाला तोंड देण्यासाठी देशाला गांधीजींची गरज आहे.”

स्वराज अभियानचे इब्राहिम खान यांनी हिंदू महासभेच्या एका नेत्याकडून गांधी हत्येशी साम्य असलेला व्हिडीओ पसरविल्या जाण्याचाही त्यांनी निषेध केला. आणि या देशाला गांधींशिवाय पर्याय नसल्याचेही सांगितले.

यानंतर समाजवादी अध्यापक सभेचे अण्णा निरफराके यांनीही आपल्या भावना मांडल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “पूर्वी काँग्रेस अभिजन वर्गाची होती. पण गांधींनी काँग्रेसला बहुजनवर्गाशी जाेडले. त्यातून काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली. गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होण्यासाठी स्त्रियांनाही जागृत केले. परिणामी देशासाठी त्या तुरुंगातही जायला तयार झाल्या.

युवा कार्यकर्ते हणमंत शिंदे म्हणाले की, “हिंदुत्ववाद्यांनी गांधींबद्दल अपप्रचार चालवला आहे. त्यामुळे आजचा तरुण भरकटत चालला आहे. त्यासाठी आपण वाचन करून महात्मा गांधींचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे.”

महाराष्ट्र अॅक्शन कमिटी जाहीद शेख म्हणाले की, “अच्छे दिनाच्या नावावर असे अच्छे दिन आले की, त्यात धर्मनिरपेक्षता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्यच धोक्यात आले आहे.”

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिव्यक्ती संघटनेच्या संयोजक अलका जोशी यांनी केले. या कार्यक्रमात लोकायत कलापथकाने गांधींच्या आदरांजलीपर गाणीही गायली.