आमच्याकडून ‘चौकीदार’ होण्याची अपेक्षा करु नका : ३.२० लाख बँक अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘चौकीदार चौर हैं’ ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम भाजपने सुरू केली आहे. सध्या भाजपाचं मै भी चौकीदार कॅम्पेन जोरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच ट्विटरवरुन डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मात्र देशातील सरकारी बँक अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ (एआयबीओसी) या संघटनेनं या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. आमचे महत्त्वाचे प्रश्न सोडवा. ते सुटेपर्यंत आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ या राजकीय मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका, अशी भूमिका या संघटनेनं घेतली आहे.

‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’नंआमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ या राजकीय प्रचारमोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका ही भूमिका घेत संघटनेनं पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मूळ समस्यांकडे लक्ष न देता तुम्ही आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ या राजकीय प्रचारमोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका. सरकारी बँक कर्मचारी सरकारच्या धोरणांमुळे त्रासलेले आहेत. एआयबीओसीचा विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलिनीकरणाला विरोध आहे. याविरोधात संघटनेनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. बँकांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं वेतन बँकांच्या कामगिरीवर आधारित असावं, यासाठी इंडियन बँक्स असोसिएशन प्रयत्नशील आहे. यालाही बँक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.

‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ ही सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. जवळपास ३ लाख २० हजार अधिकारी (एकूण अधिकाऱ्यांच्या ८५ टक्के) या संघटनेचे सदस्य आहेत.