महिन्यापूर्वी उद्घाटन केलेले सार्वजनिक शौचालय ढासळले 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दामूनगर येथील सार्वजनिक शौचालय कोसळल्याची घटना समोर आली आहे. शौचालय कोसळल्याच्या आवाजाने शेजारी राहणारे नागरिक बाहेर पळत आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कांदिवली पुर्वकडील दामूनगर येथील झोपडपट्टीत सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक महिन्यापूर्वीच या शौचालयाचे बांधकाम करण्यासाठीच्या कामाचे उद्घाटन झाले होते. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.

सदर शौचालय हे दुरुस्तीच्या अवस्थेत होते. मुख्य म्हणजे, भाजपच्या नगरसेविका प्रितम पंडागळे यांनी गेल्या महिन्यापूर्वीच दुरूस्तीसाठी त्याचा नारळ फोडला होता. यानंतर हे शौचालय आता कोसळले आहे. यानंतर मनसे नेत्याने यावर टीका केली आहे. दुरूस्ती करण्यास विलंब केल्याने शौचालय कोसळल्याचा आरोप मनसे शाखा अध्यक्ष संतोष नाईक यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्र २६ मधील पाटील चाळ याठिकाणी हे शौचालय आहे असे समजत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शौचालयाची अवस्था बिकट होती. सदर शोचालय हे धोकादायक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले होते. म्हणून ते नव्याने बनवावे अशी नागरिकांची इच्छा होती. त्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांनी लोकप्रतिनिधी आणि पालिका आर. दक्षिण विभागाकडे पाठपुरावा केला होता. परंतु, पालिकेच्या लालफिती कारभारामुळे त्याचे काम होवू शकले नाही. अखेर हे शौचालय अचानक कोसळल्याने आता रहिवाशांमध्ये संताप पसरल्याचे चित्र दिसत आहे.