शपथविधीनंतर अवघ्या 48 तासात पुदुच्चेरीचे CM रंगास्वामींना कोरोनाची बाधा, चेन्नईत उपचार सुरू

चेन्नई : वृत्तसंस्था –   पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर एन. रंगास्वामी यांनी शुक्रवारी (दि. 7) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर अवघ्या 48 तासात रंगास्वामी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. रंगास्वामी यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पुदुच्चेरी आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना कोरोनाची बाधा झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल केले आहे. रंगास्वामी यांची प्रकृती स्थिर आहे. पुदुच्चेरीमधील इंदिरा गांधी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये रंगास्वामी यांची कोरोना चाचणी केली होती. एन. रंगास्वामी यांनी शुक्रवारी (दि. 7) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर आरोग्य विभागाकडून 183 जणांची कोरोना चाचणी केली. त्यात 11 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पुदुच्चेरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रविवारी (दि. 9) एकाच दिवशी सर्वाधिक 26 जणांचा मृत्यू झाला. तर 1633 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. पुदुच्चेरीत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या 71 हजार 709 झाली आहे.