Shani Jayanti 2020 : कधी आहे शनि जयंती, जाणून घ्या शनि देवाच्या पुजेचं महत्व आणि मुहूर्त

पोलिसनामा ऑनलाईन – हिंदी पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यात अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. यावर्षी २२ मे रोजी शनि जयंती आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, ज्यांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो, त्यांचे आयुष्य सुखी होते. शनिदेव ज्याच्यावर क्रोधित झाला आहे, त्यांच्या आयुष्यात केवळ अमंगळच असते. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. म्हणून या दिवशी शनिदेवाची भक्तिभावाने आणि श्रद्धापूर्वक पूजा केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

शनी जयंती शुभ मुहूर्त
या दिवशी शुभ मुहूर्त दिवसभर आहे, कारण अमावस्या २१ मे रोजी रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होत आहे, जी २२ मे रोजी रात्री ११ वाजून ०८ मिनिटांनी संपेल. दिवसात कोणत्याही वेळी शनिदेवाची पूजा करू शकता, पण ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान (शुभ वेळ) उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. यासोबतच तुम्ही चौघडिया मुहूर्तामध्ये पूजा देखील करू शकता.

शनी जयंतीचे महत्व
हा दिवस खूपच शुभ आहे, कारण ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी वट सावित्री व्रत देखील आहे. हा व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिले आहे की, शनिदेव आणि यमराज हे दोघेही सूर्य देवाचे पुत्र आहेत. त्यामुळे या दोन्ही सणांचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक शनिदेवाची पूजा करतात. असे म्हणतात की, शनिदेव न्याय देवता आहेत आणि ते सगळ्यांना आपल्या कर्मांनुसार फळ किंवा शिक्षा देतात. या दिवशी ओम शनिश्राय नमः मंत्राचा जप केल्याने सर्व दुःखं व अडचणी दूर होतात.