‘या’ प्रकरणी राहुल गांधींनी मागितली माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल प्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोर्टाची माफी मागितली आहे. राहुल गांधी यांनी न्यायालयाचा हवाला देत ‘चौकीदार चोर है’ हा शब्दप्रयोग केला होता. तुम्ही जे बोललात, ते आम्ही सांगितले होते का ? असा सवाल न्यायालयाने केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २२ पानी प्रतिज्ञापत्र सादर केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत फटकारले. यानंतर राहुल गांधी यांचे वकिल अभिषेक मनू संघवी यांनी माफी मागितली.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठापुढे याप्रकरणाची सुनावणी सुरू असून दिलगिरी व्यक्त करण्यासाठी २२ पानाचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाते का ? असा थेट सवाल न्यायालयाने विचारला. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलगिरी हा शब्द अवतरणात लिहला आहे. यावरून न्यायालयाने खडेबोल सुनावत अवतरणात दिलगिरी शब्द लिहण्याचा अर्थ काय काढायचा असा सवाल राहुल गांधी यांच्या वकिलांना विचारला.

न्यायालयाचा हवाला देत राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है हा शब्दप्रयोग केला होता. त्यावर ताशेरे ओढताना तुम्ही जे बोललात, ते आम्ही सांगितले होते का ? असा सवाल न्यायालयाने केला. यावर राहुल गांधी यांनी आपली चूक मान्य करत आहेत. त्यासाठी ते माफी मागत आहे. त्यांनी न्यायालयाचा हवाला देवून असे विधान करायला नको होते, संघवी म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावतीने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी सोमवारपर्यंतचा वेळ मागितला आहे. त्यावर न्यायालयाने सोमवारच्या आधी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. तसेच प्रतिज्ञपत्र स्विकारायचे की नाही, हे आम्ही ठरवू असेही न्यायालयाने स्पष्ट केले.