‘कधीही विसरु नका, कधीही माफ करु नका’ ! पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 2 वर्ष पूर्ण, नेटिझन्सकडून सैनिकांना श्रद्धांजली

0
51
pulwama
pulwama

मुंबई : कधीही विसरु नका, कधीही माफ करु नका, अशा शब्दात नेटझिन्सनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त सीआरपीएफ जवानांना आज श्रद्धांजली वाहिली.

आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार सुदर्शन पट्टनाईक यांनी वाळूशिल्प तयार करुन पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफचा काफिला जम्मू हून श्रीनगरकडे जात होता. या काफिल्यात ७८ बसमधून सुमारे अडीच हजार जवानांना नेण्यात येत होते. आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद डार याने आयआयडीने भरलेली कार या काफिल्यातील एका बसवर नेऊन धडकवली. त्यात ४० जवान ठार झाले होते. पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सर्वाधिक पसंती देणारा राष्ट्र हा दर्जा मागे घेतला होता. काही दिवसांनी भारताने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या संघटनेचे सर्वात मोठे दहशतवादी प्रशिक्षण शिबीर असलेल्या बालाकोठ येथे हवाई हल्ला करुन या हल्ल्याचा बदला घेतला होता.

या हल्ल्यात ठार झालेल्या ४० जवानांची नावे असलेल्या स्मारकाचे उद्घाटन १४ फेब्रुवारी २०२० रोजी पुलवामा येथील लेथपोरा शिबिराच्या सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात करण्यात आले. या स्मारकात त्यांच्या छायाचित्रासह सर्व ४० सैनिकांची नावे आणि सीआरपीएफच्या सेवा व निष्ठा हे बीद्रवाक्य लिहिण्यात आले आहे.
सोशल मिडियावर आज या जवानांना नेटकरी श्रद्धांजली वाहत आहेत.