पुलवामा हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण ! शहीदांच्या कुटुंबियांना अद्याप नाही मिळाली सरकारी ‘मदत’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ला झाला होता. यात देशाने आपले अनेक जवान गमावले होते. या हल्ल्याला एक वर्ष उलटून गेल्यानंतर देखील शहीद झालेल्या जवाणांच्या कुटुंबियांना अद्याप कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही. या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील विरपांगरा गावातील शहीद जवान नितीन राठोड यांचे कुटुंबीय अजूनही हा घटनेतून बाहेर आलेले नाहीत. नितीनच्या संपूर्ण गावाकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे.

नितीनची आम्हाला खूप आठवण येते आजही त्याची आणि त्याच्या फोनची देखील वाट आम्ही पाहत असतो. नितीनचे वडील शिवाजी राठोड म्हणाले की, नितीन शहीद झाल्यानंतर सरकारने आमच्या कुटुंबाला पाच एकर जमीन, पेट्रोल पंप, एक कोटीचा बंगला देण्याचे आश्वासन दिले होते, जे अद्याप पूर्ण झालेला नाही. नितीनचे शिक्षक एम.एस. चौहान सांगतात की राठोर कुटुंबाने त्यांचा मुलगा देशासाठी गमावला.

सरकारने नितीनच्या कुटुंबियांना दिलेले आश्वासन पूर्ण करायला पाहिजे असं सर्वांनाच वाटत आहे. तसेच सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाईचे पाऊल उचलायला हवे असे येथील प्रत्येक गावकऱ्याला वाटते. नितीन गावातील सर्वांसोबत मिळून मिसळून राहत असे मात्र त्याच्या जाण्याने आम्ही आजही दुःखी असल्याचे गावातील नेहरू चौहान यांनी सांगितले.