‘पुलवामा’मध्ये शहीद झालेल्या जवानाची पत्नी ‘मल्टीनॅशनल’ कंपनीची नोकरी सोडून होणार लष्करी अधिकारी, जाणून घ्या कसा आला विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 28 वर्षांच्या निकिता कौल भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशनमध्ये शहीद झालेले मेजर विभूती शंकर ढौंढियाल यांची पत्नी निकिता कौल आता भारतीय लष्करात भरती होऊन देशाची सेवा करणार आहेत. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर जैशच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर विभूती शहीद झाले होते.

काश्मीरच्या रहिवाशी असलेल्या निकिता कौल यांनी एसएसी (शॉर्ट सिलेक्शन कमिशन) च्या परीक्षेसह इंटरव्ह्यूसुद्धा पास केला आहे. त्या मेरिट लिस्ट जारी होण्याची वाट पहात आहेत. यानंतर त्या कॅडेटम्हणून लष्करात सहभागी होतील. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेले असतानाच 18 फेब्रुवारी 2019 ला पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या ऑपरेशनमध्ये मेजर विभूती शहीद झाले होते.

त्यांचे म्हणणे आहे की, शहीद पतीला ही खरी श्रद्धांजली ठरेल आणि त्यांच्याजवळ स्वताला ठेवण्याचा हा मार्ग असेल. कौल दिल्लीत आपल्या पालकांसह राहतात आणि एका मल्टीनेशनल कंपनीत काम करतात. त्यांना आपल्या पतीप्रमाणे एक अधिकारी व्हायचे आहे.

त्या म्हणाल्या, मला नव्या गोष्टी शिकायच्या आहेत. हे माझ्यासाठी कॉर्पोरेट कल्चरपेक्षा एक मोठे ध्येय आहे. मला माझ्या पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्यास वेळ लागला आणि लघु सेवा आयोगाच्या (एसएससी) परीक्षेला बसण्याचा निर्णय खुप उशीरा झाला. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणे हा माझ्यासाठी मोठा निर्णय होता. परंतु, मी ठरवले होते की मी माझ्या पतीप्रमाणे पुढे जाणार.

त्या म्हणाल्या, परीक्षा प्रक्रियेमध्ये त्यांना पतीकडून मिळालेल्या माहितीचा फायदा झाला. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करणे माझ्यासाठी खुप भावनिक क्षण होते. त्यावेळी माझ्या मनात आले की माझ्या पतीनेही आर्मी जॉईन करण्यासाठी अशीच परीक्षा दिली असेल, त्यावेळी त्यांच्या जवळ असल्याची जाणीव झाली.

कौल यांचे म्हणणे आहे की, पती शहीद झाल्यानंतर सामान्य जीवनात परतणे एवढे सोपे नसते आणि पुन्हा कामाला लागणेही सोपे नसते. या वेदना कमी होतील असे वाटते. मी माझ्या पतीच्या मृत्यूनंतर 15 दिवसानंतर ऑफिसला जाऊ लागले, कारण मला स्वताला व्यस्त ठेवायचे होते.