अबब ! टोमॅटो १८० रुपये अन्, भेंडी १२० रुपये किलो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टोमॅटो १८० रुपये किलो, भेंडी १२० रुपये किलो तर ढोबळी मिरची ८० रुपये किलो असा चढा भाव मंडईमध्ये दिसून येत आहे. हा काही भारतातील मंडईमधील भाज्यांचा भाव नसून लाहोरमधील मंडईतील भाज्यांचा भाव आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा सर्वाधिक प्राधान्य असलेला देशाचा (एमएफएन) दर्जा काढून घेतला. आयात निर्यात शुल्कही मोठ्या प्रमाणावर वाढविले. त्यामुळे पाकिस्तानला जाणाऱ्या भाज्यांची निर्यात बंद झाली आहे. त्याचा परिणाम पाकिस्तान सीमेवरील लाहोर सारख्या शहरात आता दिसू लागला आहे.

काँग्रेसचा मोदी सरकारवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ 

मध्य प्रदेशातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा माल पाकिस्तानमध्ये न पाठविण्याचा निर्णय घेतला. अटारी -वाघा बॉर्डरमार्गे दररोज किमान ७५ ते १०० ट्रक टोमॅटो व इतर भाजीपाला पाकिस्तानला निर्यात केला जात होता. पुलवामा हल्ल्यानंतर ही निर्यात बंद झाली आहे. त्याचा थेट परिणाम लाहोरमधील भाजी मंडईत दिसत आहे. तेथे टोमॅटो १८० रुपये किलो, भेंडी १२० रुपये तर ढोबळी मिरची ८० रुपये किलो भावाने विकली जात आहे. इतर भाज्याही कडाडल्या आहेत.

२०१७ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. तेव्हाही निर्यात बंद करण्यात आली होती. तेव्हा टोमॅटो ३०० रुपये किलो भावाने विकला गेला होता. आताही पाकिस्तानमध्ये भाज्यांचे भाव असेच कडाडलेले राहण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानला होणारी निर्यात बंद झाल्याने देशातील भाज्यांचे भाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आखाती देश व इतर बाजारपेठांचा पर्याय खुला करुन द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.