#PulwamaAttack : ‘पतीशी फोनवर बोलत असतानाच झाला स्फोट’

लखनऊ : वृत्तसंस्था – पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर भीषण आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले तर, अनेक जवान गंभीर जखमी झाले. जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यातील गाडीलाआरडीएक्सने भरलेली गाडी धडकवत हा हल्ला घडवला. या हल्ल्यात उत्तर प्रदेशचे प्रदीप सिंह यादव हेही शहीद झाले. ज्यावेळी हा भीषण स्फोट झाला त्यावेळी ते आपल्या पत्नीशी फोनवर बोलत होते. दुर्दैवाने हा त्यांचा आपल्या पत्नीबरोबरचा अखेरचा फोन कॉल ठरला. त्यांची पत्नी नीरज देवींनी याबाबत माहिती दिली आहे. हे सांगताना त्या अतिशय भावूक झाल्या होत्या.

याबद्दल सांगताना नीरज देवी म्हणाल्या, “ज्यावेळी माझे पती गाडीत होते त्यावेळी मी त्यांच्याशी फोनवर बोलत होते. ते आपल्या दोन वर्षाची छोटी मुलगी सोनाबद्दल बोलत होते. ते जवळपास १० मिनिटे आपल्या चिमुकलीबद्दल बोलत होते. त्यानंतर काही वेळाने मोठा आवाज झाला, शांतता पसरली आणि फोन कट झाला. मी पुन्हा कॉल केला पण लागला नाही.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “नंतर बऱ्याच वेळाने सीआरपीएफ कंट्रोल रुममधून फोन आला आणि त्यांनी ब्लास्टमध्ये माझ्या पतीचा मृत्यू झाल्याची बातमी दिली.” हे सांगताना त्या अतिशय भावूक झाल्या होत्या.

यानंतर याबाबत प्रदीप यांच्या भावाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “जरी आमचा भाऊ देशासाठी शहीद झाल्याचा आम्हाला अभिमान वाटत असला तरी आम्ही आतून मात्र प्रचंड चिडलो आहे. सरकारने आता फक्त आश्वासन न देता कृती करावी” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्रदीप सिंह यादव यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Pulwama terror attack : ७ जण ताब्यात