पुलवामा हल्ल्यावर शंका घेणारे राज ठाकरे आता म्हणतात…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान पुलावामा हल्ला घडला होता की, मग घडवून आणला होता असा प्रश्न वारंवार उपस्थित केला होता. परंतु या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले असून याच्यावर राज ठाकरेंनी बोलणे टाळले. ‘जे शहीद झाले, त्यांचं दुर्दैव’ फक्त एवढंच म्हणून त्यांनी फारसे काही भाष्य केले नाही. ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.

एका पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न केला की, आज पुलवामा हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले, त्यावेळी या हल्ल्यावरुन तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तर त्या हल्ल्याबद्दल आज तुम्हाला काय वाटतं ?, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, त्याच्यावर काय बोलणार आता? जे शहीद झाले त्यांचं दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गानं घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आलं होतं. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरे म्हणाले की, ‘मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडलं. जायचे ते गेले. नवीन सरकार बसलं. सगळ्या गोष्टी घडल्या,’ अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केलं आहे.

दरम्यान त्यावेळी राज ठाकरे यांनी दावा केला होता की, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एयर स्ट्राइक केला. परंतु त्यांना चुकीची माहिती देण्यात आली होती. यामुळे बॉम्ब जंगलात पडले. या घटनेत दहशतवादी मेलेच नव्हते असे त्यांनी स्पष्ट केले होते. या एयर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या मृत्यूबाबत त्यांनी शंका उपस्थित करून हा सर्व जाणूनबुजून घडवण्यात आलेला प्रकार आहे कारण कुठलेही लष्कर हे माहितीच्या आधारावरच कारवाई करत असते. असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.