पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रेलरोको करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले आहेत. दरम्यान याचा निषेध म्हणून नागरिकांनी सकाळी 8 वाजल्यापासून नालासोपाऱ्यात रेलरोको केला होता. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून रेलरोको थांबवला. ४ तास हा रेलरोको सुरु होता.

गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले आहेत. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दरम्यान या हल्याचा निषेध म्हणून, नागरिकांनी नालासोपाऱ्यात आज ( १६ फेब्रुवारी ) रेलरोको केला होता. सकाळी ८ वाजल्यापासून हा रेलरोको केला होता. ऐन गर्दीच्या वेळी हा रेलरोको करण्यात आला. या रेलरोकोला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नालासोपारा परिसरातील दुकाने, रिक्षा, वसई विरार पालिकेची बस सेवा, एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली.

मात्र ऐन गर्दीच्या वेळी हा रेलरोको करण्यात आल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे ट्रॅकवर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. काही रेल्वे गाड्या नालासोपारा स्टेशन परिसरातच थांबल्या. दरम्यान पोलिसांनी रेलरोको थांबवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान पोलिसांनी बाळाचा वापर करू म्हणजेच जमलेल्या नागरिकांवर लाठीचार्ज करून रेलरोको थांबवला. दरम्यान चार तासांनतर नालासोपाऱ्याहून विरारकडे जाणारी लोकल सेवा सुरु झाली आहे.