पुण्यातील व्यावसायिकाच्या घरातून पावणे 2 कोटींचा ऐवज चोरी, नातेवाईक 27 वर्षीय तरूणीला अटक तर साथीदारावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील एका व्यावसायिकाच्या घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा पावणे दोन कोटींचा ऐवज चोरून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित नातेवाईक महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी अक्षय भंडारी (वय 33,रा. गायत्री अपार्टमेंट, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 27 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. तर तिचा साथीदार पसार झाला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी हे व्यावसायिक आहेत. त्यांचा चाकण परिसरात व्यवसाय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापना बंद होत्या. त्यात बँकाही बंद होत्या. त्यामुळे भंडारी यांनी घरात जवळपास 1 कोटी रुपयांची रोकड ठेवली होती. याची माहिती महिलेला होती. तिने स्वत:च्या घरात चोरी करण्याचा कट रचला. गेल्या वर्षभरापासून नातेवाईक महिला आणि साथीदाराने संगनमत करून घरातून दागिने लांबविले. त्यानंतर घरात ठेवलेली एक कोटी रुपयांची रोकडही लांबविली.

भंडारी यांच्या निदर्शनास नुकताच हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार खडके, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी भंडारी यांच्या घरातील सदस्य तसेच कामगारांची चौकशी सुरू केली. दरम्यान, चौकशीत भंडारी यांच्या नात्यातील एका महिलेवर संशय बळावला. तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तिने साथीदाराबरोबर संगनमत करून रोकड आणि दागिने चोरल्याची कबुली दिली. पसार झालेल्या साथीदाराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक के. बी. पावसे करत आहेत.