Pune : मार्केटयार्ड परिसरातील ATM सेंटरमधील मशिनमध्ये छेडछाड करून 10 लाख काढले, ‘बंटी-बबली’वर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सायबर चोरट्यांचा ताप वाढला असून, ऑनलाइनद्वारे पैसे उकळण्यासोबतच आता रस्त्यावर उतरून सायबर चोरटे एटीएमच्या माध्यमातून लाखो रुपये काढत फसवणूक करत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर एटीएममध्ये छेडछाड करून 5 लाख काढल्याचे प्रकरण ताजे असताना मार्केटयार्ड भागात अश्या प्रकारे 10 लाख रुपये काढून फसवणूक केली आहे.

याप्रकरणी शेकू राठोड (वय 39, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिला व पुरुषावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बँक कर्मचारी आहेत. दरम्यान मार्केटयार्ड परिसरात गेट क्रमांक 4 जवळ कॅनरा बँकेचे एटीएम केंद्र आहे.

दहा दिवसांपूर्वी (दि. 17 मार्च) एक अनोळखी महिला आणि पुरुष पैसे काढण्याच्या बहाण्याने आत शिरले. तसेच आत मध्ये जाऊन त्यांनी प्रथम त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेतून काही तरी बाहेर काढले. त्यानंतर एटीएम मशीनच्या मागे जात छेडछाड केली. त्यानंतर एटीएम कार्डद्वारे 1 लाख रुपयांचे 50 ट्रँझक्शन दाखवून 10 लाख काढत फसवणूक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या वतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत.

दरम्यान फर्ग्युसन रस्त्यावर देखील भल्या गर्दीच्या वेळी एका महिलेने व पूरूषाने आत शिरून अश्या प्रकारे 5 लाख रुपये काढून फसवणूक केली होती. आता हा दुसरा प्रकार उघड झाला आहे.