Coronavirus : पुण्यात 24 तासात 10 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत तिघांचा मृत्यू तर बाधितांचा आकडा 120 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : शहर पोलीस दलात एकाच दिवसात 10 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, प्रथमच एका दिवसात 10 जणांना लागण झाली असून, यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १२० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

शहर पोलीस दल कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काम करत आहे. त्यावेळी हे काम पार पाडत असताना पोलिसांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यातच आता शनिवारी पोलीस दलात दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे शहराचा आकडा वाढत असताना पोलिसांचा देखील आकडा वाढत आहे. राज्यात कोरोनाचा पहिल्या रुग्ण पुण्यात आढळला होता. त्यानंतर शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले.

कंटमेंट झोनमध्ये काम करत असताना प्रथम मध्यवस्तीमधील एका पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला करोनाची लागन झाली होती. त्यानंतर याच पोलीस ठाण्यातील 8 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर संपूर्ण पोलिस ठाणे क्वारंटाईन करण्यात आले होते. कोरोनाचा पोलिस दलात प्रसार वाढू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी नेमला आहे. तसेच आवश्यक त्या खबरदारी घेण्यात आल्या आहेत.

मात्र शहरातील नियमांत 1 जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा रस्त्यावरील वावर वाढला. तर जुने प्रतिबंधित क्षेत्र संख्या कमी होऊन नवीन क्षेत्र निर्माण झाले आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागात पोलिसांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. बंदोबस्त, गुन्ह्यांबाबत व कारवाईसाठी पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी जावे लागत असल्याने पोलिसांचा नागरिकांसोबत संबंध वाढला आहे. त्यातून कोरोनाचा धोका वाढला आहे. पुणे पोलिस दलात आतापर्यंत १२० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. दरम्यान, आतापर्यंत 87 हून अधिक पोलिस कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र, त्यांची नेमकी आकडेवारी समजू शकलेली नाही.