पुणे : वाहतूक गतीमान करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागातील 11 रस्ते एक्सप्रेस म्हणून घोषित महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांची माहिती

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – शहराच्या मध्यवर्ती भागातील मंदावलेली वाहतूक गतीमान करण्यासाठी प्रमुख ११ रस्ते एक्सप्रेस रस्ते म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या करिता या रस्त्यांवरील पार्किंगचे प्रमाण कमी करण्यासोबत रस्त्याच्या कडेला बसणारे पथारी व्यावसायीक, तसेच दुकानांच्या समोर टाकण्यात येणार्‍या लोखंडी जाळया आणि लाकडी पायदानांवर कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. महापालिकेचा अतिक्रमण विभाग, वाहतूक पोलिसांच्यावतीने या सर्व रस्त्यांचे सातत्याने मॉनिटरींग करण्यात येणार असून येेथे बेकायदा पथारी थाटणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

माधव जगताप यांनी सांगितले, की महापालिका आणि पोलिसांच्या समन्वयाने शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी मागील वर्षभरापासून दोन्ही विभागांतील अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठका होत आहेत. या बैठकीमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे, यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला असलेले पार्किंग, पदपथ आणि रस्त्यांवरील विक्रेते, दुकानदारांकडून दरवाजासमोरील रस्त्यावर टाकण्यात येणार्‍या लोखंडी जाळ्या, तसेच दुकानाबाहेर ठेवण्यात येणार्‍या वस्तु व साहित्यामुळे पादचारी रस्त्यावर येतात.

यामुळे वाहतुक कोंडी होउन वाहतुकीचा वेग मंदावला असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.
या निष्कर्षावरून वाहतुकीला गती देण्यासाठी रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमण कमी करण्याची मोहीम संयुक्तरित्या हाती घेण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला शिवाजी आणि बाजीराव रस्ता, सातारा रस्ता, फर्गसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता, सोलापूर रस्ता, सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, नगररस्ता, राजभवनकडून खडकीकडे जाणार्‍या अंतर्गत रस्त्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

कालपासून या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच या रस्त्यांवर असलेली पार्किंगची व्यवस्था काही भाग वगळुन कमी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होवू नये यासाठी वाहतूक पोलिस आणि स्थानीक पोलिस ठाण्यांचे पोलिसही मॉनिटरींग करणार आहेत. पुन्हा अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही माधव जगताप यांनी दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/