Pune : मिळकतकर अभय योजनेत 11 हजार मिळकतधारकांनी भरले 26 कोटी 66 लाख रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  स्थायी समितीने जाहीर केलेल्या मिळकतकर अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दहा दिवसांमध्ये ११ हजार ४०३ मिळकत धारकांनी २६ कोटी ६६ लाख ३६ हजार रुपये थकबाकी भरली आहे. दरम्यान, या योजनेला आणखी गती देण्यासाठी अन्य विभागातील १०५ लिपिकांची कर आकारणी विभागात तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर आकाराणी बाहेर असलेल्या मिळकतींची आकारणी करण्यासाठी २०० लिपिकांची एकवट मानधनावर भरती करण्यात येणार आहे.

मिळकतकराची थकबाकी वसुल करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखालील बैठकीमध्ये अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून २ ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मिळकतकरावर आकारण्यात येणार्‍या दंड व व्याजाच्या रकमेत ८० टक्के सवलत देण्यात येत असल्याने थकबाकीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मागील दहा दिवसांत मुळ आकारणीची २३ लाख २३ लाख ११ हजार रक्कम मिळाली तर दंडापोटीचे ३ कोटी ४३ लाख २४ हजार रुपये मिळाले आहेत. तर दंड व व्याजावरील ८० टक्के सवलतीमुळे थकबाकीदारांचा १३ कोटी ७२ लाख ९९ हजार रुपये इतका फायदा झाला आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाच्यावतीने शहरातील आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेउन त्या आकारणीखाली आणण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. यासाठी मोठ्याप्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. कर विभागाकडील कर्मचारी तसच अन्य विभागातून आलेल्या साधारण २०० कर्मचार्‍यांसोबतच एकवट मानधनावर २०० अनुभवी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती कर आकारणी व संकलन प्रमुख सह आयुक्त विलास कानडे यांनी दिली.