काही महिलांसह १२ पोलिस कर्मचार्‍यांचा पुणे पोलिस आयुक्‍तांविरूध्द ‘एल्गार’

पुणे : एनपी न्यूज नेटवर्क – पोलिस आयुक्‍तालयातील १२ हून अधिक पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस आयुक्‍त डॉ. के व्यंकटेशम् यांच्याविरूध्द ‘एल्गार’ पुकारला आहे. पोलिस आयुक्‍तांनी दि. ३१ मे रोजी ३४ पोलिस कर्मचार्‍यांच्या मुदतपुर्व बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये शहरातील विविध पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांसह गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश होता. बदल्या करण्यात आलेल्यापैकी काही महिला पोलिस कर्मचार्‍यांसह १२ पोलिसांनी ‘मॅट’ कोर्टात धाव घेतली आहे.

कार्यकाल पुर्ण झाला नसताना देखील ३४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही जणांविरूध्द त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी डिफाल्ट रिपोर्ट पाठविले होते. मात्र, इतर कर्मचार्‍यांबाबत कोणाचीही तक्रार नसताना त्यांच्या अचानकपणे पोलिस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर काही पोलिस कर्मचारी ‘मॅट’ कोर्टात जातील म्हणून त्याच दिवशी (म्हणजेच दि. ३१) त्यांच्या बदल्यात अंशतः बदल करून पोलिस कर्मचार्‍यांच्या शहरातील विविध पोलिस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या. बदल्या करण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना सध्याच्या ठिकाणावरून तात्काळ कार्यमुक्‍त करण्यात आले आणि त्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, मुदतपुर्व बदल्या झालेल्या एकुण ३४ पोलिस कर्मचार्‍यांपैकी १२ पोलिसांनी मॅट कोर्टात धाव घेतली असून त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. एकंदरीत मुदतपुर्व बदल्या झालेल्यांपैकी काही महिलांसह एकुण १२ पोलिसांनी पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम् यांच्याविरूध्द ‘मॅट’ कोर्टात ‘एल्गार’च पुकारला आहे. पोलिसांनी ‘मॅट’ कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर दोन दिवसानंतर सुनावणी होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे.

Loading...
You might also like