भरधाव दुचाकीच्या अपघातात 16 वर्षाच्या मेव्हण्याचा मृत्यू, भावजी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-बेंगलोर महामार्गावर डुंकरखिंडीकडून वारजेकडे येत असताना भरधाव दुचाकीचे अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात पाठिमागे बसलेल्या 16 वर्षीय मेव्हण्याचा मृत्यू झाला. तर, भावजी जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. दोघांनीही हेल्मेट परिधान केले नव्हते.

माऊली नारायण पोडमल (वय 16, रा. तीन हत्ती चौक, पद्मावती) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, रमेश मारूती शिंदे (वय 26) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक एस. व्ही. कसबेवाड यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सरकारतर्फेे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रमेश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली हा रमेश याचा मेव्हणा होता. नुकताच माऊली याच्या बहिणीशी त्याचा विवाह निश्चीत झाला होता. साखरपुड्याचा कार्यक्रम काही दिवसांपुर्वी झाला आहे. तत्पुर्वी माऊली याने सातवीनंतर शाळा सोडून दिली होती. तो कामे करत होता.

तर, आरोपी भावजी रमेश हा फरशी बसविण्याचे कामे करतो. पुण्यात आल्यानंतर भावजी रमेश हा माऊली याला देहूरोडला असणार्‍या मित्राला भेटण्यासाठी घेऊन गेला होता. दुचाकीवरून ते गेले होते. तेथून परत ते पद्मावती येथे येत होते.

यावेळी मुंबई-बेंगलोर महामार्गावरील आर.एम.डी. कॉलेजसमोर आल्यानंतर भरधाव दुचाकीसमोर अचानक गाडी आल्याने त्याने ब्रेक दाबले. यावेळी पाठिमागे बसलेला माऊली उडून खाली कोसळला. तर, दुचाकी स्लीप होऊन रमेश खाली कोसळला. यात माऊली याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, भावजी रमेश हा जखमी झाला आहे. दोघांनीही हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते तर माऊलीचा जीव वाचला असता असे सांगितले जाते. अधिक तपास उपनिरीक्षक अशोक येवले हे करत आहेत.