Coronavirus : दिलासादायक ! आतापर्यंत पुण्यातील 173 पोलिस कर्मचारी-अधिकारी झाले ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या हाहाकारात 24 तास पुणेकरांसाठी उभा असणाऱ्या पुणे पोलीस दलातील तब्बल सव्वा दोनशे पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तबल 18 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान 173 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडेकोट लॉकडाऊन करण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यापासून पोलीस दल रस्त्यावर उभा राहून सेवा करत आहेत. या कठीण काळात 24 सेवा देणाऱ्या पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी नेमून त्यांना कर्मचाऱ्याची देखभाल करण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक सहाय्यक आयुक्त यांची नेमणूक केली आहे. त्यानुसार लागण झालेल्या सर्व पोलिसांची काळजी घेतली जाते. तर कर्मचारी व अधिकारी यांना मास्क, सॅनीटायझर तसेच सर्व खबरदारी घेतली जात आहे. त्यासोबत पोलीस लाईनला देखील लक्ष देऊन काम केले जात आहे.

मात्र यानंतर देखील शहर पोलीस दलातील सव्वा दोनशे पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 207 कर्मचारी आणि 18 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील 11 अधिकारी उपचार घेऊन बरे देखील झाले आहेत. तसेच 162 जवळपास कर्मचारी उपचारानंतर ठणठणीत होऊन पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. दुर्दैवाने 3 कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

–चौकट–
पोलिसांच्या कुटुंबासाठी भाजीपाला शहरात पोलिसांच्या 7 हुन अधिक पोलीस लाईन आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पोलीस आयुक्तांनी कुटुंबियांसाठी पोलीस लाईनमध्ये किराणा आणि भाजीपाला तेथेच मिळण्यासाठी सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा कुटुंबियांना होत आहे.