Pune : पुरंदरमधील एका आश्रमातील 8 ते 9 वयोगटातील 19 मुले आढळली कोरोनाबाधित; तालुक्यात खळबळ

सासवड : पोलीसनामा ऑनलाइन –  ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच शिरुरमधील एका निवासी आश्रमशाळेतील मुलींना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुरंदर तालुक्यातील एका आश्रमातील ८ ते ९ वयोगटातील १९ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून या सर्व मुलांना उपचारासाठी आनंदी काेविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आश्रमात ७९ मुले असून मुख्य व्यवस्थापक, मदतनीस यांच्यासह साधारण नऊ ते १० जणांचा कर्मचारी वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी मुख्य व्यवस्थापक, मदतनीस यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर चार मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे येथील ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने आश्रमातील मुलांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये १९ मुले कोरोनाबाधित आढळून आली. या सर्व मुलांना आनंदी काेविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांनी तत्काळ इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले. त्यानुसार इमारतीचे निर्जंतुकीकरण केले आहे. अजूनही काही मुलांची कोरोना चाचणी राहिली आहे. त्यामुळे सर्व मुलांची कोरोना चाचणी घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे माळशिरस केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक आबनावे यांनी सांगितले.

दरम्यान, आश्रमातील इतर मुलांचे त्याच ठिकाणी विलगीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून या मुलांची दररोज तपासणी करण्यात येत आहे. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात येत असल्याचे संबंधित गावच्या संरपंचाकडून सांगण्यात आले आहे.