Pune : सदाशिव पेठेतील सेवानिवृत्त सरकारी डॉक्टरचा बंद फ्लॅट फोडून 2.25 लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्याचर सत्र सुरूच असून, चोरट्यांनी सदाशिव पेठेत सेवानिवृत्त सरकारी डॉक्टरचा बंद फ्लॅट फोडून सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान हा प्रकार घडला आहे.

अलकनंदा अशोक वाडेकर (वय ७१) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलकनंदा गृहिणी असून त्यांचे पती अशोक सेवानिवृत्त सरकारी डॉक्टर आहेत. ते सदाशिव पेठेतील सरस्वती प्रसाद इमारतीत राहतात. दरम्यान लॉकडाउन काळात अशोक हे मुंबईतील घरी थांबले होते. त्यामुळे अलकनंदा ९ सप्टेंबरला पुण्याहून मुंबईत त्यांच्याकडे गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून २ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेला. अलकनंदा काल मुंबईहून पुण्यात आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सी. एस. वाबळे करीत आहेत.

मोलकरणीने मारला डल्ला…
शहरात बंद फ्लॅट फोडले जात असताना मोलकरणीनेच मालकाचे घर साफ करत 2 लाखाची रोकड पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. सॅलसबरी पार्क सुयोग पुष्प सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी राजेंद्र मुथ्था (वय ५८) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोलकरणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी येथील सुयोग पुष्प सोसायटीत राहायला आहेत. त्यांचे घरकाम करण्यासाठी एक मोलकरणीन होती. १ ते ३ डिसेंबर कालावधीत तिने राजेंद्र यांची नजर चुकवून घरातील कपाटातले २ लाखांची रोकड चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक एम. त्र्यंबके करीत आहेत.