Pune : शहरात रात्रीच्या वेळी मारहाणीच्या 2 घटना, भारती विद्यापीठ आणि लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनची दिवसा कडक अंमलबजावणी सुरू आणि रात्री मात्र शहरात मारहाण, खून आणि लुटमारीचे प्रकार घडत आहेत. दुचाकीस्वार टोळके रात्रीचे स्वास्थ धोक्यात आणत आहेत. काल (शुक्रवार) रात्री शहरात एक खून आणि मारहाणीच्या दोन घटना घडल्या आहेत. यात विनाकारण आणि शुल्लक कारणावरून हे वाद झाल्याचे दिसत आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सुनील सुरवसे (वय 30) यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार 3 ते 4 अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे टेम्पो चालक आहेत. दरम्यान, रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ते आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर चौकात पाण्याच्या बाटल्या भरत होते. यावेळी अचानक दुचाकीवर टोळके आले. त्यांनी गाडी चालवतो का असे म्हणत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली. तसेच एकाने थेट खाली पडलेले तुटके संडासचे भांडे फिर्यादी यांच्या डोक्यात घालून त्यांना गंभीर जखमी केले आणि हे टोळके पसार झाले.

त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. दुसरा प्रकार हा उरुळी देवाची परिसरात घडला आहे. यात अल्लाबक्ष बागवान (वय 35) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे आरोपींना ओळखतात. एकमेकांच्या शेजारी राहतात. किरकोळ कारणावरून त्यांना या चौघांनी बेदम मारहाण करत त्यांना जखमी केले आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.