येरवडा जेलमधील हायप्रोफाईल आरोपीची ‘सेवा’ करणारे 2 पोलिस निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फसवणुक प्रकरणातील एका हायप्रोफाईल आरोपीला कोर्ट कामकाजासाठी येरवडा जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने घरी घेवुन जाणार्‍या दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे. कुठलीही परवानगी नसताना पोलिसांनी केलेले हे कृत्य त्यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिस उपायुक्‍त स्वप्ना एच. गोरे यांनी त्यांच्या निलंबनाबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पोलिस नाईक नामदेव दादाभाऊ डगळे आणि कमलेश बाळासाहेब पाटील (दगाबाज) अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ते दोघेही पोलिस मुख्यालयातील कोर्ट कंपनीत नेमणुकीस आहेत. दि. 3 नोव्हेंबर रोजी डगळे आणि पाटील यांना येरवडा कारागृहातुन आरोपीला बाहेर काढुन कोर्टत हजर करण्याबाबतचा आदेश देण्यात आला होता. मागणीपत्रात केवळ एकाच आरोपीचा उल्‍लेख करण्यात आला होता. त्यांना केवळ एका आरोपीला येरवडा जेलमधून बाहेर आणण्यास नेमले असताना त्यांनी येरवडा जेलमधून विशाल दत्‍तात्रय शिंदे आणि दिपक यशवंत पाटील यांना ताब्यात घेतले. कोर्टातील कामकाज संपल्यानंतर त्यांनी आरोपी विशाल शिंदे याला कोर्ट लॉकअप येथे जमा केले आणि पोलिस कर्मचारी विखे यांना वॉरंट नोंद करण्याकामी कोर्ट लॉकअप येथे पाठविले. त्यानंतर पोलिस नाईक डगळे आणि पोलिस कर्मचारी पाटील यांनी आरोपी दिपक यशवंत पाटील यांना खाजगी वाहनाने कोथरूड परिसरातील करिष्मा हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅट नं. 904 येथे नेले. दरम्यान, याबाबतची माहिती शहर नियंत्रण कक्षाला प्राप्‍त झाला. नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांनी तात्काळ घडलेल्या या प्रकराबाबत अलंकार पोलिस ठाण्यास कळविले. अलंकार पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यास सुरवात केली. त्यांनी पोलिस ठाण्यातील मार्शल डयुटीवर असलेल्या पोलिसांना करिष्मा सोसायटीमध्ये पाठविले. त्यावेळी पोलिस नाईक डगळे आणि पोलिस कर्मचारी पाटील हे आरोपी दिपक यशवंत पाटील यांच्यासह तेथे आढळुन आले. त्यांना अलंकार पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आरोपी दिपक यशवंत पाटील याच्याविरूध्द चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात भादंवि 420,406,409,467,468,471,474 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पोलिस नाईक डगळे आणि पोलिस नाईक पाटील यांनी केलेले हे कृत्य पोलिस खात्यास शोभनीय नसल्याने तसेच त्यांनी आदेशाकडे दुर्लक्ष देवुन कर्तव्यामध्ये कसूर करून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याने त्यांना सेवेतुन निलंबीत करण्यात आले आहे.