Pune : प्रजननच्या वयातील 20 % महिला PCOS आजाराने ग्रस्त !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.बदलती जीवनशैली, आहार तसेच व्यायामाचा अभाव या कारणामुळे १८ ते ३५ या वयोगटातील २० ते ३०टक्के महिला पीसीओएससारख्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. वंध्यत्व, गर्भपात होण्याचा धोका, लठ्ठपणा, मधुमेह, असामान्य रक्तदाब, नंतरच्या आयुष्यात कर्करोग यासारख्या इतर गुंतागुंत. पीसीओएस सारख्या आजारामध्ये महिलांना गर्भपात, गर्भधारणा न होणे, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मुदतीपूर्व प्रसूती आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सा-या समस्यांपासून दूर राहण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य वजन राखण्यावर भर देत आहे.

या आजारामुळे हॉर्मोन्सचे समतोल बिघडते. परीणामी दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात तयार होणाऱ्या स्त्रीबीजाचे प्रमाणही घटते. यामुळे पुढे जाऊन त्यामुळे वंधत्व येण्याची शक्यता असते.ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि जास्त कार्बोहायड्रेट आणि ट्रान्स फॅट्सचे आहारातील सेवन यामुळए पीसीओएस सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. पीसीओएस असलेल्या महिलांना मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्येचा जाणवू लागतात. अनियमित पाळी येणे आणि बीजांडकोषात अनेक गाठी निर्माण होऊन हॉर्मोन्सचा समतोल बिघडणे ही पीसीओएसची लक्षणे आहेत असे पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रो हॉस्पीटलच्या प्रसूति व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गिरिजा वाघ सांगतात.

इन्सुलिनची पातळी कमी करण्यासाठी आणि आपल्या आतडे निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. बियाणे, बेरी, शेंगा, संपूर्ण प्रकारचे धान्य खा. चिकन, मासे, सोयाबिन, टोफू यांचा आहारात समावेश करा. एवोकॅडो, ब्राऊन राईस, पालक खा . पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये टाइप -2 मधुमेहाचा धोका जास्त असतो. काजू, बियाणे, फळे, भाज्या आणि कमी कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ खा. मिठाई, प्रक्रिया केलेले पदार्थ, मेदयुक्त पदार्थ टाळा. मुरुम किंवा केस गळती कमी करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधांचे सेवन करा असेही डॉ वाघ यांनी सांगितले.

पीसीओएसमध्ये बाळाला जन्म देणे आणि गर्भधारणा होणे जोखमीचे असू शकते. फर्टीलिटी एक्स्पर्टकडे उपचाराकरिता येणार्‍या प्रत्येक तिस-या महिलेस पीसीओएसची समस्या असते. महिलांमध्ये लठ्ठपणा सारखी समस्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली असून हे देखील पीसीओएस सारख्या आजारास कारणीभूत ठरत आहे. योग्य बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 असतो परंतु बीएमआय 27-28 च्या वर जातो आणि ही चिंताजनक होते आणि अशा व्यक्ती लठ्ठपणासारख्या आजाराने ग्रासतात. पीसीओएस ही आयुष्यभर आरोग्याची स्थिती आहे परंतुसारख्या आजारापासून दूर राहण्याकरिता अचूक जीवनशैली, संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि वजन नियंत्रणात असणे गरजेचे आहे असे नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे येथील फर्टीलिटी कन्सलटंट डॉ. भारती ढोरेपाटील यांनी सांगितले.

डॉ. ढोरे पाटील पुढे सांगतात पीसीओएस ग्रस्त महिला गर्भवती होण्यास ब-याचदा इतर स्त्रियांशी तुलना करू करतात आणि मात्र पीसीओएस सारख्या आजाराने या महिलांची प्रजनन क्षमता कमी झालेली असते आणि त्यामुळे या महिलांना गर्भधारणेस जास्त वेळ लागतो. अशा प्रकरणांमध्ये नैसर्गीकरित्या गर्भधारणा होत नसलेल्या स्त्रियांनी इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) सारख्या उपचार पध्दतीचा आधार घ्यावा. यामुळे महिलांना कृत्रिमरित्या मातृत्वाचा अनुभव घेता येणे शक्य होते. पीसीओएस असलेल्या महिलांनी आयव्हीएफ तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार योग्य उपचार निवडणे गरजेचे आहे.