200 मे.टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा फेरविचार करावा, सत्ताधारी भाजप नगरसेवकानेच केली स्थायी समितीकडे मागणी

पुणे (शिवाजीनगर) : पोलीसनामा ऑनलाइन – देवाची उरूळी परिसरातील गावांतील गोळा होणार्‍या कचर्‍यावर तेथील कचरा डेपोच्या आवारामध्ये २०० मे. टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास विरोधकांसोबतच भाजपच्या सदस्यांनीही विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेनेसोबतच आता भाजपच्या सदस्यानेही या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, असा स्वतंत्र प्रस्ताव स्थायी समितीमध्ये ठेवला आहे. विशेष असे, की अवघ्या आठवड्यापुर्वी आतापर्यंतची सर्वाधिक अर्थात ५०२ रुपये प्रतिटन टिपिंग फी असलेल्या या प्रकल्पाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेली देवाची उरूळी परिसरातील गावे तसेच या गावांच्या लगत असलेल्या महापालिकेतील वसाहतींमध्ये निर्माण होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने मागीलवर्षी जून महिन्यांत निविदा मागविल्या होत्या. यामध्ये सहभागी झालेल्या तीन निविदा धारकांपैकी भूमी ग्रीन एनर्जी प्रा.लि. या कंपनीची निविदा सर्वाधिक कमी अर्थात ५३७ रुपये प्रतिटन टिपिंग फी व दरवर्षी १० टक्के दरवाढ अशी आली होती. मात्र, हे दर सध्या अस्तित्वात असलेल्या शहरातील अन्य प्रकल्पांना देण्यात येणार्‍या दरांपेक्षा सुमारे दीडशे ते पावणेदोनशे रुपयांनी अधिक आहेत. यामुळे प्रशासनाने संबधित कंपनीशी चर्चा करून दर कमी करण्याची विनंती केली. त्यानुसार कंपनीने स्थापत्य विषयक कामांसाठीचा खर्च १० कोटी रुपयांवरून साडेसात कोटी रुपयांपर्यंत कमी केला. टिपिंग फी देखील ५०२ रुपयांपर्यंत कमी करताना वार्षिक दरवाढही ८.५ टक्क्यापर्यंत कमी केली. यानंतर मागील स्थायी समितीच्या बैठकीमध्ये प्रशासनाकडून हा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. स्थायी समितीमध्ये ऐनवेळी ठेवलेला प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आला.

परंतू यावेळी बैठकीतून बाहेर पडलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक महेंद्र पठारे यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तातडीने विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक दिपक मानकर, प्रकाश कदम आणि स्वत:च्या स्वाक्षरीने या प्रकल्पाच्या फेरविचाराचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला. यापाठोपाठ काॅंग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर, शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनीही स्वतंत्र पत्र देत या प्रकल्पाचा फेरविचाराचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला. त्याचप्रमाणे भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य राजेंद्र शिळीमकर यांनीही या प्रस्तावाचा फेरविचार करण्याचे पत्र स्थायी समितीला दिले असून १२ मार्चला होणार्‍या बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे.

विशेष असे की नुकतेच अंदाजपत्रकावर झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये काही नगरसेवकांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पावरून प्रशासनावर जोरदार आरोप केले. तसेच मनसेचे गटनेेते वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेउन भूमी ग्रीन एनर्जी प्रा.लि. आणि घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांचे साटेलोटे असल्याचाही आरोपही केला आहे. या पार्श्‍वभूमीवर सलग दुसर्‍यांना स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झालेले हेमंत रासने आणि नवीन सदस्य काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.